मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरचं मुंबई दौरा करणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाला नवं वळणं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमित शाह रविवार 16 एप्रिल रोजी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं असून, अनेक उलटसुलट चर्चा सध्या सुरु आहेत. मुंबईतील खारघरच्या सेंट्रल मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अमित शहांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. आणि याच कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी अमित शहा मुबंईत दाखल होणार आहे.
तसेच, यंदा मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकवायचा, असा चंग भाजपने बांधलाय. तर कोणत्याही स्थितीत हा गड राखायचाच, असा निर्धार सुद्धा ठाकरे गटाने केला आहे. मात्र, आता अमित शहांच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंना डिवचण्याची एकही संधी भाजपकडून सोडली जात नसून भाजपने मातोश्रीबाहेर जोरदार पोस्टर्स बाजी केल्याचं दिसून आलं आहे. मातोश्री बाहेर पडताच अमित शाह यांचे स्वागत करणारे मोठे बॅनर तथा पोस्टर्स झळकवण्यात आले आहेत. अमित शहांच्या स्वागतासाठी मुंबईत जोरदार तयारी केली जातेय, मात्र ती करतानाच उद्धव ठाकरे यांनाही टार्गेट केलं जातं असल्याचं यातून पुन्हा दिसून आलं आहे.
दरम्यान, या पोस्टर्सवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांचे देखील फोटो लावण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेरच हे बॅनर्स लावल्याने त्यांची जास्त चर्चा होतेय.सोशल मीडियावर देखील हे पोस्टर्स व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहिती नुसार अमित शहा हे आज शनिवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 7 वाजता त्यांचे आगमन होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मागील महिन्यात 19 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरमध्ये आले होते. यावेळी अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन देखील घेतलं होत. त्यापूर्वी नागपूर दौरा देखील अमित शहा यांनी केला होता. आणि पुन्हा एकदा मुंबई दौरा करणार असून, राजकीय गोटात अनेक तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.