सातारा – मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या आदल्या दिवशी म्हसवडचा बाजार असतानाही शेतकरी व व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास लावून हजारो रुपयांचे नुकसान करण्यात आले. सभेदिवशीही दुकाने, भाजी मंडई सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवायला लावून बाजारकरू, शेतकरी, व्यापाऱ्यांना नाहक त्रास देण्यात आले.
तीच परिस्थिती उमेदवारी अर्ज भरतेवेळी दहिवडीच्या आठवडा बाजाराच्या दिवशीही निर्माण करण्यात आली होती. अशा स्वार्थी माजी लोकप्रतिनिधीला व्यापारी व शेतकरी त्याची जागा दाखवतील, असा इशारा माण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांनी दिला.
म्हसवड, ता. माण येथे व्यापारी, व्यावसायिकांच्याभेटीप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, माजी लोकप्रतिनिधी स्वार्थी राजकारण करत आहे. दहिवडी व म्हसवड या तालुक्यातील मुख्य बाजारपेठा आहेत. तेथील आठवडा बाजारावर अनेकांचे संसार चालतात. त्यांना सोयीसुविधा उपलब्ध देणे राहिले बाजूला, उलट त्यांच्या पोटावर मारण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधीकडून होताना दिसत आहे.
माजी लोकप्रतिनिधीने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दहिवडीत आठवडा बाजार बंद करून जाहीर सभा घेतली. तोच प्रकार म्हसवडलाही केला. मुख्यमंत्र्यांच्या सभेदिवशी बसस्थानक ते महात्मा फुले चौकापर्यंतची दुकाने बंद ठेवली. शहरात रस्त्यांवर नाकाबंदी केल्याने त्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी असून ती त्यांनी व्यक्तही केली होती. त्यामुळे जनता या माजी लोकप्रतिनिधीला मतांच्या माध्ययमातून चांगलाच धडा शिकवेल, असा इशारा शेखर गोरे यांनी दिला.