सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षेचे उपाय राबवण्याचे आवाहन
पुणे – पुणे पोलिसांकडून दर मंगळवारी आयोजित करण्यात येणारी साप्ताहिक बैठक करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रमुखांबरोबर संवाद साधला. करोनामुळे पोलिसांनी मास्कचा वापर करुन पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून टीआरएम (आठवडा आढावा बैठक) बैठकीचे आयोजन करण्यास सुरुवात केली. या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना तसेच प्राधान्याने करण्यात येणाऱ्या कामांबाबत आढावा घेण्यात येतो. करोनामुळे पोलीस आयुक्तालयात दर मंगळवारी आयोजित करण्यात येणारी प्रत्यक्ष बैठक रद्द करुन ऑनलाइन पद्धतीने शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांबरोबर संवाद साधण्यात आला.
या बैठकीत अधिकारी सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह आदी उपस्थित होते.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच पोलिसांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉ. वेंकटेशम यांनी केले.
पोलिसांनी मास्क तसेच सॅनिटाझरचा वापर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. पोलीस रस्त्यावर उतरुन काम करतो. त्याचा नागरिकांशी थेट संबंध येतो. त्यामुळे पोलिसांनी पुरेशी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
करोनामुळे काहीजण चढ्या भावाने विक्री करून किंवा वस्तुंचा तुटवडा निर्माण करुन काळ्या बाजारात विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यातील सर्व आधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी काळ्याबाजार करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी,
– अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त