पावसाची दांडी : धरणात 45.81 टक्के पाणीसाठा
पवनानगर – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात 45.81 टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाने दांडी मारल्याने आठवडाभरात धरण साठ्यात किंचितही वाढ झाली नाही.
पवना धरण परिसरामध्ये मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली झाली होती. परंतु आठवडाभरापासून पावसाने दांडी मारल्यामुळे पाणी साठ्यात अजिबात वाढ झालेली नाही.
गेल्या 24 तासांत या परिसरात शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून धरण क्षेत्रात 1130 मिलीमीटर पावसाची नोंद असून मागील वर्षी आजमितीला धरणात 83 टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षाच्या तुलनेत धरणामध्ये 37 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासियांची चिंता वाढली आहे.