एकमताने नव्हे; वादावादीनंतर विकेंड लॉकडाऊनचा निर्णय

कॉंग्रेस-राष्ट्रवादीने हाणून पाडला संपूर्ण लॉकडाऊन

मुंबई – देशातील करोनाव्हायरसचा वाढता प्रभाव पाहता आणि महाराष्ट्रातील रुग्णसंख्येच्या वाढीचा वेग पाहता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासन यांनी 11 दिवस कडक लॉकडाऊनचा विचार केला होता. त्यावर निर्णय घेण्याकरता झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मात्र विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात एकमताने हा निर्णय झाल्याचे सरकार दाखवत असले, तरी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या 11 दिवसांच्या लॉकडाऊनच्या प्रस्तावाला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने कडाडून विरोध केल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या 50 हजार, तर मुंबई शहरातील रुग्णसंख्या 10 हजारांवर पोहोचली आहे. सर्वत्रच आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. बेड्‌स उपलब्ध असले तरी डॉक्‍टर्स आणि परिचारिकांची संख्या तुटपुंजी आहे. मृत्युदरात झपाट्याने वाढ होत आहे. हे सर्व थोपवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य प्रशासन किमान आठ ते 11 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करावा, या भूमिकेत होते.

रविवारची ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या वेळी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी तर इतर मंत्री आपापल्या निवासस्थानी किंवा मंत्रालयातील कार्यालयात होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि सरकारच्या कठोर निर्बंधांच्या निर्णयाला पाठिंबा देण्याची विनंती केली. तसेच ठाकरे यांनी राज्यातील उद्योजकांची बैठक घेऊन कामगारांची जबाबदारी उद्योजकांनी घेण्याचे आवाहन केले. याला उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी 11 दिवसांच्या पूर्ण लॉकडाऊनला विरोध केला. “लोकांचे रोजगार पुन्हा जातील. हवे तर निर्बंध कठोर लादा. हॉटेल, मॉल्स, थिएटर, चौपाट्या आदी गर्दीची केंद्रे बंद करा,’ अशी भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली. “लॉकडाऊनमध्ये जिल्हा वाहतूक बंद होते. परिणामी बाजार समित्या ठप्प होतात. त्यात कृषी मालाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हवे तर रात्रीची संचारबंदी करा, पण संपूर्ण लॉकडाऊन नको’, असा सूर राष्ट्रवादीच्याही मंत्र्यांनी लावला.

मोदींच्या संपूर्ण लॉकडाऊनवर आम्ही कायम टीका करत आलो आहोत. हा विषय भावनिक होता. कारण, त्याचा नागरिकांवर मोठा मानसिक परिणाम होतो. तो संपूर्ण लॉकडाऊनचा शब्द टाळण्यात आम्ही यशस्वी झालो, असे एका कॉंग्रेसच्या मंत्र्यांने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.