नवी दिल्ली : एक आठवड्याच्या लॉकडाऊननंतरही पॉझिटिव्हिटी दर सर्वाधिक राहिल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन जाहीर केला.
या लॉकडाऊनची मुदत सोमवारी पहाटे पाच वाजता संपत होती. ती आता तीन मे रोजी सकाळी पाच वाजता संपेल.
व्यापारी आणि सामान्य नगरिकांसह साऱ्यांनी या लॉकडाऊनचे समर्थन केले आहे. जर पॉझिटिव्हिटी रेट जर या स्थितीत 36 ते 37 टक्क्यावर जात असेल तर लॉकडाऊन लावण्यावाचून पर्याय नाही. आज तो 29 टक्के असला तरी त्याचा अर्थ करोना संपला असा होत नाही, असे केजरीवाल म्हणाले.
केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांची ओळखपत्रे दाखवून प्रवास करता येईल. अन्य व्यक्तींना मात्र इ पास साठी अर्ज करावा लागेल. मात्र या टप्प्यात कुरीयर सर्व्हिसेस, वायरमन, प्लंबर किंवा वॉटर फ्युरीफायर दुरूस्ती करणारे, शैक्षणिक पुस्तकाची दुकाने आणि इलेक्ट्रिकल पंखे दुरूस्त करणारी दुकाने खोलण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्यांनी प्रवासासाठी इ पाससाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑक्सिजनचा तुटवडा कायम
केंद्राने आम्हाला 480 टन ऑक्सिजन मंजूर केला अहे. मात्र, कालच ऑक्सिजनची गरज 490 टन होती. आमची ऑक्सिजनची गरज 700 टन आहे प्रत्यक्षात आम्हाला 335 टन ऑक्सिजन मिळत आहे. मंत्री आणि आमदार दूरध्वनी करत समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही काही ठिकाणी यशस्वी होत आहोत काही ठिकाणीन आमचे प्रयत्न अपुरे पडत आहेत, आम्हाला मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानत आहे, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्पष्ट केले.