आंबेगाव तालुक्‍यात खुरपणीच्या कामांना वेग

अवसरी- आंबेगाव तालुक्‍यात सध्या शेतातील पिकांच्या खुरपणीच्या कामांना वेग आला आहे. गहू , हरभरा, कांदा अशा पिकांबरोबरच अनेक पिकांच्या खुरपणी सुरू असल्याचे चित्र तालुक्‍यातील अनेक भागात पहावयास मिळत आहे.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गेल्या दीड महिन्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शेतात पाणी साठल्याने गवत मोठ्या प्रमाणात उगवलेले आहे. शेतात उगवलेले गवत काढून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा, गहू, हरभरा, मका तर अशा अनेक पिकांबरोबरच जनावरांच्या खाद्याची लागवड केली आहे.

सुरुवातीच्या काळात तण नाशकांची फवारणी केली असली तरी सुद्धा सद्यस्थितीत कांदा, गहू, हरभरा अशा विविध पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण उगवले आहे. त्यामुळे खुरपणीच्या कामाला वेग आला आहे. वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे शेतीपिकांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. वातावरणातील बदलामुळे थंडीत वाढ झाली असली तरी पहाटेच्या वेळेस धुके पडत असल्याने कांद्यासारखी पीके रोगराईला बळी पडत आहेत. पिकांची खुरपणी करून खते देऊन पाणी भरण्याच्या कामात सध्या शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.