राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त साताऱ्यात बुधवारी कार्यक्रम

आ. शशिकांत शिंदे यांची माहिती

कोरेगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 21 व्या वर्धापनदिना निमित्त पक्षाच्या जिल्ह्यातील विविध आघाड्यांच्यावतीने बुधवार, दि. 10 रोजी सातारा येथे राष्ट्रवादी भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून, रक्तदान शिबिर व नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विधान परिषदेचे नवनिर्वाचित आ. शशिकांत शिंदे यांनी केले आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस 21 व्या वर्षात पर्दापण करत आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी केलेल्या सूचनांना अनुसरुन वर्धापनदिन साजरा करताना सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवार, दि. 10 रोजी जिल्हा कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन रक्तदान शिबिर होणार आहे. सध्या रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता असून, गरजूंना तातडीने रक्त उपलब्ध व्हावे, हा शिबिराचा उद्देश आहे. युवा कार्यकर्ते व पदाधिकारी शिबिरात सहभागी होणार आहेत.

लॉकडाऊननंतर सर्वांना भेटणार
पक्षाने आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मी आता पुन्हा आमदार झाल्याचा जिल्ह्यातील लोकांना व कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. आमदार म्हणून मी जिल्ह्यात प्रथमच येणार असल्याने अनेकांची मला भेटायची इच्छा आहे. त्यामुळे गर्दी होऊ शकते, सध्याच्या परिस्थिती करोनाविरोधातील लढ्यात मला अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायच्या आहेत. उपाययोजना हाती घ्यायच्या असून काही निर्णय घ्यायचे आहेत. यासाठी सहकार्य करावे. माझीही सर्वांना भेटायची इच्छा आहे; परंतु सध्या आपण हे टाळावे. पक्षाच्या वर्धापनदिन कार्याक्रमात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मी स्वत: प्रत्येक विभागात येऊन कार्यकर्त्यांना भेटणार आहे. कोणालाही त्रास होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी. विनंतीला मान देऊन सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आ. शिंदे यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.