‘मावळ’च्या 208 मतदान केंद्राचे ‘वेब कास्टिंग’

लोकसभा निवडणूक : दिल्लीत बसूनही पाहता येणार मतदानाची प्रक्रिया

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या 2 हजार 504 मतदान केंद्रापैकी 208 मतदान केंद्रांच्या संपूर्ण प्रक्रियेचे थेट “वेब कास्टिंग’ करण्यात येणार आहे. त्यामुळे, निवडणूक आयोगाला थेट दिल्लीत बसूनही मतदान प्रक्रिया पाहता येणार आहे. तसेच, निवडणूक विभाग मावळमधील संवेदनशील असलेल्या 73 मतदान केंद्रावरही लक्ष ठेवणार असून या मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडु नये, म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

यावेळची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जावी, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने कोणतीही कसर ठेवण्यात आलेली नाही. मावळ लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे, निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी, निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. निवडणुकीची जवळपास 95 टक्के प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने अनेक बदल केले आहेत. मतदारांना सुविधा पुरवण्यापासून ते मतदानाच्या प्रक्रियेवर थेट मुख्य निवडणूक आयोगाकडून नजर ठेवण्यापर्यंतची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी, मावळ लोकसभा मतदार संघात तब्बल 208 मतदान केंद्राचे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. “वेब कास्टिंग’च्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयोग थेट दिल्लीमध्ये बसून या मतदान केंद्रातील हलाचालींवर नजर ठेवणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 58, कर्जत 35, उरण 29, मावळ 37, चिंचवड 7 व पिंपरी 40 अशा 208 मतदान केंद्रावर हे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी, या मतदान केंद्रावर इंटरनेटची जोडणी करण्यात येणार आहे. वेबकास्टिंग साठी निवडलेल्या मतदारसंघामध्ये संवेदनशील मतदान केंद्रेही असणार आहेत. त्यामुळे, मतदानाच्या दिवशीची प्रत्येक गोष्टीचे निवडणूक आयोगाकडून स्वत: निरीक्षण करण्यात येणार आहे. तसेच वेब कास्टिंगमुळे मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही कार्यालयातूनही या मतदान केंद्राची पाहणी करता येणार आहे.

सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे पिंपरीत मावळ लोकसभा मतदार संघामध्ये एकूण 73 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. सर्वाधिक 19 संवेदनशील मतदान केंद्रे पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहेत. त्या पाठोपाठ कर्जत 16, मावळ 16, पनवेल 10, चिंचवड 9, उरण विधानसभा मतदारसंघात 3 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. मावळ मतदारसंघात असलेल्या 2 हजार 504 मतदान केंद्राचा विचार करता संवदेनशील मतदान केंद्राची टक्केवारी 2.91 एवढी अल्प आहे. परंतु निवडणूक विभागाकडून आवश्‍यक त्या सर्व कार्यवाही हाती घेण्यात आल्या आहेत. शांततापूर्ण आणि पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी या मतदान केंद्रावर अतिरिक्‍त पोलीस दल तसेच विविध माध्यमातून निवडणूक विभागाची नजर राहणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)