इंडोनेशियातील बोर्नियोच्या जंगलांमध्ये वणवा

70 कोटी टन कार्बन हवेत पसरला

जकार्ता: इंडोनेशियाच्या बोर्नियोच्या सदाहरित जंगलांमध्ये सातत्याने आग भडकत आहे. आगीच्या घटनांमुळे बोर्नियोतील स्थिती अमेझॉनच्या जंगलांपेक्षाही बिकट झाल्याचे युरोपीय महासंघाने म्हटले आहे. बोर्नियोच्या जंगलांमधील वणव्यांमुळे 70 कोटी टन कर्बवायू हवेत मिसळला आहे. कॅनडाच्या वर्षभरातील उत्सर्जनाइतके हे प्रमाण आहे. युरोपीय महासंघाशी संलग्न कॉपरनिकस ऍटमॉस्फियर मॉनिटरिंग सर्व्हिसनुसार अमेझॉनच्या जंगलांमधील आगीमुळे 579 मेगाटन कर्बवायू हवेत मिसळला गेला होता. आता बोर्नियाच्या आगीतून बाहेर पडलेला कर्बवायू त्याहून 22 टक्के अधिक आहे. शेतांमधील गवत तसेच अन्य तृण नष्ट करण्यासाठी लावण्यात आलेली आग आता 4000 चौरस किलोमीटरपेक्षा अधिक भागात फैलावली असून ती मलेशिया आणि ब्रुुनेईपर्यंत पोहोचली आहे.

आगीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. तर स्थानिक लोकांना श्वसनसंबंधी आजार होत आहेत. बोर्नियोतील आग मागील 16 वर्षांमधील सर्वात भयानक आहे. पण बोर्नियो आणि अमेझॉनच्या जंगलांमधील आगीची तुलना केली जाऊ शकत नाही, दोन्ही क्षेत्र भिन्न असल्याचे कॉपरनिकस मॉनिटरिंग सर्व्हिसने म्हटले आहे.
वर्ष 2015 मध्ये इंडोनेशियात 26 लाख हेक्‍टर भागात आग लागल्याने 21.8 अब्ज डॉलर्सचे (सुमारे 1.5 लाख कोटी रुपये) नुकसान झाले होते. शेतजमीन जलदपणे मोकळी व्हावी याकरता तेथे आग लावण्याचे प्रकार तुलनेने अधिक आहेत.

नॅशनल इन्स्टीटयूट फॉर स्पेस रिसर्चनुसार अमेझॉनमध्ये मागील 8 महिन्यांमध्ये 73,000 वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. 2018 च्या तुलनेत यंदा अशा घटनांमध्ये 83 टक्के वृद्धी नोंदली गेली आहे. ब्राझील सरकारने या घटनांच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टच्या प्रारंभीच आणीबाणी घोषित केली होती. ब्राझीलमध्ये अमेझॉनच्या सदाहरित जंगलांचा 60 टक्के भाग मोडतो. हे वनक्षेत्र जगाला 20 टक्के प्राणवायूचा पुरवठा करते. तसेच अमेझॉनचे जंगल एकूण 10 टक्के जैववैविध्य बाळगणारे क्षेत्र असून या वनक्षेत्राला पृथ्वीचे फुफ्फुस असे मानले जाते. हे वनक्षेत्र संपुष्टात आल्यास जगावर अत्यंत प्रतिकूल प्रभाव पडणार असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)