weather update – राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून विशेषता विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यवतमाळसह अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 45 अंशावर गेला असून यवतमाळ जिल्ह्यात 48 तासांत आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या सर्वांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल असल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दिग्रस येथे चोवीस तासात तिघांच्या मृत्यूची माहिती पुढे आली होती. यासोबतच यवतमाळच्या चापमनवाडी आणि भोसा मार्गावर दोघांचे, पुसदमध्ये दोन, तर बाभुळगाव येथे एकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. यातील चौघांची ओळख पटली असून चौघे अज्ञात आहेत. बाभुळगांवच्या गवंडी ते किन्ही रस्त्यावर पुलाखाली मारोतराव कावे यांचा मृतदेह आढळून आला. तर पुसदच्या हनुमान वॉर्डात अन्नपूर्णा मुळे या वृद्ध महिलेने भर उन्हात कुलरमध्ये पाणी भरले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. पुसदच्याच नगरपरिषदेच्या इंदिरानगर भागातील डम्पिंग यार्डसमोर सुभाष राठोड यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्यात प्रचंड उष्ण लहरी वाहत असून, भर उन्हात बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.