यंदा हवामान राहणार मेहेरबान!

‘स्कायमेट’कडून दिलाशाची फुंकर

पुणे – हिवाळ्याच्या अखेरपासूनच दुष्काळाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना “स्कायमेट’ या हवामानविषयक संस्थेने मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या पावसाळ्यात मान्सून अर्थात मोसमी पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या दृष्टचक्रातून सुटका होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

“स्कायमेट’ने वर्तविलेल्या अंदाजानुसार, “यंदा जून-जुलै-ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्‍यता 50 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. तर, पॅसिफिक महासागरात करण्यात आलेल्या निरीक्षणांनुसार डिसेंबर-2018 अखेरीस एल-निनोची तीव्रता काही प्रमाणात वाढली होती. पण, त्यानंतर तापमानात घट झाल्याने ही तीव्रता कमी नोंदविण्यात आली आहे. ही भौगोलिक परिस्थिती कायम राहिल्यास यंदाचा मान्सून सामान्य राहून मुबलक प्रमाणात पाऊस पडेल. शिवाय काही निर्देशकांनुसार देशाच्या काही भागात मात्र पावसाच्या कालावधीत खंड पडण्याची शक्‍यता आहे. पण, हे प्रदेश कोणते असतील, याबाबत सविस्तर अंदाजात स्पष्ट करण्यात येईल.’

वरील अंदाजानुसार जर पाऊस सरासरी म्हणजे 96 ते 100 टक्‍क्‍यांच्या आसपास राहिला, तर 2015 हे वर्ष वगळता मागील 5 वर्षांत पावसाचे प्रमाण सामान्य राहिले आहे. त्यामुळे यंदाही मान्सून समाधानकारक असण्याची चिन्हे आहेत. आगामी हंगामात पावसाची सरासरी कशी असले, याबाबत “स्कायमेट’चा पहिला सविस्तर अंदाज 15 मार्चनंतर आणि दुसरा अंदाज 15 एप्रिलनंतर दिला जाणार आहे.

मागील वर्षी तूट
मागील वर्षी म्हणजे 2018 जून-सप्टेंबरपर्यंत देशात 97 टक्‍के पाऊस पडण्याची शक्‍यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली होती. पण, प्रत्यक्षात पावसाची सरासरी 91 टक्के राहिली. त्यातही विशेषत: परतीच्या पावसाने ओढ दिल्याने डिसेंबरच्या सुरुवातीपासून राज्याच्या काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पुढील तीन महिन्यांत ही स्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.