मुंबई – 29 एप्रिल 2016 रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावलं. ‘सैराट’ चित्रपटाने भारतासह परदेशात देखील सिनेरसिकांची मने जिंकली आहेत. अशा चित्रपटांमधून नागराजने आपले दिग्दर्शकीय कौशल्य सिद्ध केले. याशिवाय नागराज चित्रपटातून अभिनयही करतो. फँड्री आणि नाळ या चित्रपटात त्याने अभिनय केला.
दरम्यान, आता आपल्या आगामी ‘तार’ या लघुपटात नागराज मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतंच या लघुपटाचा ऑफिशल प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. खाकी शर्ट, खाकी पॅंट, टोपी खांद्यावर अडकलेली खाकी पिशवी, आणि त्यात पत्रांचा गठ्ठा.
असा अस्सल मनाला भावणारा पोस्टमन बनून नागराज मंजुळे ‘तार’च्या माध्यमातून पोस्टमनच्या खऱ्या आयुष्याची कथा प्रेक्षांसमोर मांडणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून जितका कल्पक आहे तितकाच त्याचा अभिनय देखील सहजसुंदर आहे.