25 किलो दागिने घालून…

मनोरंजनाच्या क्षेत्रातील कलाकारांना मेकअपसाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे आता सर्वसामान्यांनाही माहीत झालं आहे. मात्र केवळ मेकअपच नव्हे तर अंगावरील पोषाख, ऍक्‍सेसरीज घेऊन अभिनय करताना या कलाकारांची काय दमछाक होत असेल याचा विचारच केलेला बरा.

आकांक्षा पुरीचेच उदाहरण पाहा ना! गेल्या जवळपास अडीच वर्षांपासून सोनी टीव्हीवर सुरू असलेल्या “विघ्नहर्ता गणेश’ या मालिकेत पार्वतीदेवीची व्यक्‍तिरेखा आकांक्षाने साकारली आहे. ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली असल्याचे दिसते. आजवर गणपतीवर अनेक मालिका येऊन गेल्या आहेत, पण या मालिकेत गणरायाशी निगडित अनेक नवनव्या कहाण्या आणि त्यांच्या सादरीकरणातील भव्यता, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यांमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

या मालिकेत आकांक्षा माता अखिलंदेश्‍वरीच्या रूपात म्हणजेच नव्या अवतारात दिसून येत आहे. हा कहाणीचा एक भाग असून यामध्ये पार्वती गणेशाला सांगते की, इंद्रदेवाची कन्या देवसेनाशी विवाह करण्यास कार्तिकेयाला तयार कर. यामध्ये पार्वती भगवान शिवांसाठी पाण्याचे शिवलिंग तयार करते. आपल्या या भूमिकेसाठी तयार व्हायला आकांक्षाला रोज दोन तास लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे तिच्या अंगावरील दागिने! या व्यक्‍तिरेखेसाठी तिच्या अंगावर असलेल्या या दागिन्यांचे वजन आहे 25 किलो.

आकांक्षा म्हणते, पहिल्या दिवशी जेव्हा मी मेकअपरूममध्ये आले तेव्हा सर्वत्र दागिने पाहून मी हैराण झाले. सुरुवातीला मला वाटले सेटवरील इतरांचेही यामध्येच आहेत, पण हे सर्व मीच परिधान करायचे आहेत म्हटल्यावर मला काहीसा धक्‍काच बसला. इतके सारे दागिने घातल्यानंतर शरीरावर मोठा भार पडतो. पण कलाकारांना असे सायास करावेच लागतात!

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.