काळाचा घाला! मृतदेह घेऊन स्मशानभूमीत निघालेल्या गाडीचा भीषण अपघात; १८ जणांचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. स्मशानभूमीत मृतदेह घेऊन निघालेल्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात १८ लोकांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हा अपघात झाला. हे सर्वजण उत्तर २४ परगना येथील बागदा येथून नवद्वीप स्मशानभूमीच्या दिशेने जात होते. यावेळी २० हून अधिक लोक प्रवास करत होते.

यादरम्यान हांसखाली येथील फुलबाडी परिसरात गाडी रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. अपघात इतका भीषण होता की, १८ लोकांचा जागीच मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुकं असल्यामुळे आणि वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस तपास सुरु आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.