कराड – कराडमधील अल्पवयीन शाळकरी मुलांनी बनावट रिव्हॉल्व्हर, कोयता व फायटर अशी शस्त्रे बाळगल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. एका मुलाला धमकवण्यासाठी मुलांनी ही शस्त्रे जवळ बाळगल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी मुलांना समज देताना त्यांच्या पालकांनाही खडसावले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराडमधील एका खासगी क्लासमध्ये जाणाऱ्या एका मुलाशी चार मुलांची वादावादी झाली होती. हा वाद वाढत गेल्यावर चौघांनी त्या एका मुलास धमकावण्यासाठी कोयता, फायटर आणि बनावट रिव्हॉल्व्हर, अशी शस्त्रे गोळा केली होती. ही शस्त्रे दप्तरात लपवून ही मुले क्लासमध्ये आली होती. ज्या मुलाशी भांडण झाले होते, त्याला घाबरवण्यासाठी चौघांनी ती शस्त्रे जवळ ठेवली होती. हा प्रकार पोलिसांना समजताच त्यांनी त्या मुलांवर पाळत ठेवले. पोलिसांनी त्यांची दप्तरे तपासल्यावर कोयता, फायटर व बनावट रिव्हॉल्व्हर सापडले. त्या पाचही मुलांना पोलीस ठाण्यात आणल्यावर पालकांनाही बोलवण्यात आले.