सातारा -येथील जिल्हा कारागृहातील एका कैद्याकडे धारदार हत्यार सापडल्याने मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी कारागृह रक्षक निजा शेखलाल तांबोळी (रा. मल्हार पेठ, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विराज विजयकुमार गरूड, मेहुल संदीप पाटील (दोघे जिल्हा कारागृह) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरील दोन्ही संशयित गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून आहेत. यातील मेहुलकडे दि. 29 रोजी मध्यरात्री एक धारदार व टोकदार हत्यार कारागृहातील शिपायांना सापडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता दुसऱ्या संशयिताच्या मदतीने दि. 5 एप्रिल रोजी कारागृहातील एका लोखंडी गजाला दगडावर घासून ते हत्यार बनवून ते तेव्हापासून जवळ बाळगल्याची कबुली दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.