‘वापी येथून मागविलेले रेमडेसिविर आम्ही स्वत: पिणार नव्हतो, तर…’

चंद्रकांत पाटलांचे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर

पुणे  – रेमडेसिविरबाबत काळाबाजार सुरू आहे. वापी येथून मागविलेले रेमडेसिविर आम्ही स्वत: पिणार नाही, तर ते पेशंटलाच देणार आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. भारतीय जनता पक्ष आणि राज्य सरकारमधील रेडमेसिविर पुरवठ्‌याचे राजकारण चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे सांगत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, त्या रेमडेसिविरबाबत काळाबाजार सुरू आहे. वापी येथून मागविलेले रेमडेसिविर आम्ही स्वत: पिणार नाही, तर ते पेशंटलाच देणार आहे रेमडेसिविर आणण्यासाठी सर्व परवानग्या आमच्याकडे आहेत. केवळ भाजपला श्रेय मिळू नये म्हणून हा खटाटोप सुरू असून, गुन्हे दाखल करण्याच्या धमक्‍या दिल्या जात आहे. पण आम्ही घाबरत नाही, असे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सरकारवर ताशेरे ओढले.

सत्ता गेली चुलीत, भविष्यात सर्वसामान्य माणूस मंत्र्यांच्या घरात घुसले तर आश्‍चर्य वाटून देवू नका. आज विविध कंपन्या, इंडस्ट्रीज कोविडसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, मुख्यमंत्री काहीच करत नसतील, तर त्यांचा काय उपयोग. शेवटी तुमचेच मंत्री रस्त्यावर उतरतील, अशीही टीका पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली.

दरम्यान, राज्याला रेमडेसिविरचा पुरवठा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संपर्क साधलेल्या पुरवठादारांचा राज्य सरकार छळ करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.