न्यूयॉर्क : सर्व जगाचे लक्ष ज्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष निवडीकडे लागले आहे त्या अमेरिकेत सध्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी तयारी सुरु केली असल्याचे दिसत आहे. मतांमध्ये आघाडीवर असणाऱ्या बायडेन यांनी आघाडी घेत असल्याने विजय नक्की असल्याचे म्हटले होते. मात्र अद्यापही प्रसारमाध्यमांनी जो बायडेन यांना अधिकृतपणे विजयी घोषित केलेले नाही. तरी पण बायडेन यांनी आम्ही ही स्पर्धा जिंकणार असल्याचे म्हणत व्हाईट हाऊसमध्ये जाण्यासाठी तयारी सुरु केली असल्याचे म्हटले आहे.
The numbers tell us a clear and convincing story: We're going to win this race.
— Joe Biden (@JoeBiden) November 7, 2020
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बायडेन यांनी पुन्हा एकदा विजयाची खात्री व्यक्त केली आहे. तसंच कमला हॅरिस काही तज्ञांच्या भेटी घेत असून व्हाईट हाऊसमधील तयारीला सुरुवात झाली असल्याचंही ते म्हणाले आहेत. “आकडे सांगत आहेत की, आम्ही स्पष्ट आणि खात्रीशीरपणे जिंकत आहोत. आम्ही ही स्पर्धा जिंकणार आहोत,” असं बायडेन यांनी सांगितलं आहे. तसंच उपाध्यपदाची निवडणूक लढणाऱ्या कमला हॅरिस काही तज्ञांची भेट घेत आहेत. व्हाईट हाऊसमधील तयारीचा ते आढावा घेतील अशी माहिती बायडेन यांनी दिली आहे.
बायडेन यांनी विजयी भाषणाची तयारी केली होती. पण टेलिव्हिजन नेटवर्क आणि इतरांच्या अनुपस्थितीमुळे त्यांनी निर्णय रद्द केला. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. महत्त्वाच्या पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, अॅरिझोना आणि नेवाडा येथील मतं भवितव्य ठरवणार असून बायडेन यांनी आघाडी घेतली आहे.
अमेरिकेतील जनतेने आपल्याला करोनाशी लढा देण्यासाठी तसंच ढासळती अर्थव्यवस्था सावरण्यासाठी, वातावरण बदल अशा अनेक गोष्टींसाठी निवडून दिल्याचं बायडेन यांनी सांगितलं आहे. देशाला एकत्र यायचं असून दुभागलं जाण्याची इच्छा नाही हे दाखवून दिलं आहे असंही ते म्हणाले आहेत. शनिवारी आपण पुन्हा एकदा जनतेला संबोधित करु अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.