Raj Thackeray | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी अर्थात निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील स्वबळावर निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच राज ठाकरे यांनी लवकरच पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची घोषणाही केली.
राज ठाकरे यांनी विधानसभेत निवडणुका लढवण्याची आपली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली. “मी निवडणुका जोरात लढवणार आहे. सभेत सहज म्हणून काहीही बोललो नाही. माझ्या भाषणांमधून लोकांचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढावा, यासाठी मी मुद्दे मांडले आहेत. या निवडणुकांमध्ये आम्ही जिंकू आणि सत्ता आणू,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
टोल माफीच्या मुद्द्यावर भाष्य
राज ठाकरे यांनी टोल माफीच्या मुद्द्यावर भाष्य करत, “टोल माफी ही आमचीच मागणी होती. काँग्रेस सरकारच्या काळापासून आम्ही टोल माफीसाठी आवाज उठवला होता. सरकारने हा निर्णय घेतला, याचं लोकांना समाधान आहे. मात्र, हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, असे वाटू नये. अनेक राजकीय पक्षांनी टोल नाके बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यापैकी काहींनी फक्त बोलून दाखवलं, प्रत्यक्षात काहीच केले नाही.”
“निवडणुकीच्या तोडांवर टोल बंद करायचे आणि निवडणूक झाल्यावर परत सुरु करायचे, असं होऊन चालणार नाही. कारण यापूर्वी अनेकदा असं झालं आहे. आम्ही टोलनाके बंद करतो असं सांगितलं गेलं, पण पुन्हा ते सुरु केले. त्यामुळे आम्ही पुन्हा हे टोल सुरु होऊ देणार नाही,” असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले, “टोलचे किती पैसे येतात आणि कुठं जातात हे कळायला मार्ग नाही. कारण आजपर्यंत हा सगळा व्यवहार कॅशमध्ये होत होता. किती गाड्या गेल्या, कुणाला किती पैसे मिळाले, कुणाच्या खिशात किती पैसे गेले, यावर सर्वच राजकीय पक्ष गप्प बसले होते. आता टोलमाफीचं श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतील. पण त्याचा काहीही संबंध नाही. टोलचे आंदोलन कुणी केलं हे सर्वांना माहिती आहे”, असेही ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले राज ठाकरे?
लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे म्हणाले, “मी मागे माझ्या सभेत बोललो होतो. अशाप्रकारे लोकांना मोफत पैसे वाटणं योग्य नाही. सरकार असं करू शकत नाही. हे पैसे राजकीय नेत्यांच्या घरचे नाही. हे सरकारचे पैसे आहेत. सरकारकडे तिजोरीत पैसे नाही. तरीही वाटप सुरू आहे. अशाने हे राज्य कंगाल होईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा :
“लाडक्या बहिणींच्या आयुष्यातील सकारात्मक बदल ‘त्यांना’ पचत नाही ” ; अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा