Israel-Iran War – इस्रायलने पुन्हा एकदा इराणला खुली धमकी दिली आहे. इराणने पुन्हा एकदा आपल्या भूमीवर हल्ला केल्यास त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे लागेल, असे इस्रायलने म्हटले आहे.
इस्रायलचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल हर्झी हालेवी यांनी सांगितले की, जर इराणने इस्रायलवर आणखी एक क्षेपणास्त्र हल्ला करण्याची चूक केली तर इस्रायलचे सैन्य त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल.
हालेवी म्हणाले की, जर इराणकडून आणखी एक क्षेपणास्त्र हल्ला झाला तर इस्त्रायल इराणविरुद्ध आतापर्यंत कधी वापरलेली नव्हती अशी शक्ती वापरेल. इराणचे काही लक्ष्य आम्ही निवडले आहेत ज्यावर आम्ही हल्ला करू शकतो.
इस्रायलने २५ ऑक्टोबरच्या रात्री इराणवर हवाई हल्ले केले. 100 इस्रायली लढाऊ विमानांनी शनिवारी पहाटे इराणच्या आकाशात घुसून जोरदार बॉम्बफेक केली. या हल्ल्यानंतर इस्रायलने इराणला इशारा दिला होता की, इराणकडून पुन्हा हल्ले झाले तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील.
अमेरिकेनेही इशारा दिला !
इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड जे ऑस्टिन यांनी इशारा दिला होता की, इराणने इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची चूक करू नये. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढेल.
यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. इराणने इस्रायलवर 180 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. बहुतेक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेने नष्ट केली होती त्यामुळे त्यांचे फारशे नुकसान झाले नाही.
दरम्यान, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे भारतही चिंतेत आहे. 25 ऑक्टोबर रोजी इराणवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानेही प्रतिक्रिया दिली होती. भारताने पुन्हा एकदा शांततेचे आवाहन केले आहे. या शत्रुत्वाचा कोणालाच फायदा होणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.
मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, आम्ही संबंधित पक्षांना संयम बाळगण्याचे आणि संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत येण्याचे आवाहन करतो. निरपराध ओलीस आणि नागरिकांचेही नुकसान होत आहे. आमचे मिशन भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत.