सीमाभिंत प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करणार

पुणे – कोंढवा आणि आंबेगाव येथे सीमाभिंत कोसळून झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येत्या आठ दिवसांत सादर होणार आहे. या अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन राज्याचे कामगार व पुनर्वसन मंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी सोमवारी येथे दिले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भेगडे म्हणाले, “कोंढवा येथे मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या नातेवाईकांसाठी कामगार मंडळाच्यावतीने 56 लाख मंजूर करण्यात आले आहेत. या अपघात मृत्यूमुखी पडलेल्या कामागारांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत.
हे सर्व कामगार परप्रांतीय असल्यामुळे त्यांच्या गावी जावून पूर्ण सर्व्हे करुन मगच हे पैसे देण्यात येणार आहेत.

बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या मजुरांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी कामगार खात्याच्यावतीने तपासणी करण्यात येत आहे. त्याबाबत बांधकाम व्यावसायिकांच्या “क्रेडाई’ या संस्थेबरोबर बैठकसुद्धा आयोजित करण्यात आली होती. कामगारांबाबत कोणकोणत्या उपाययोजना राबविण्यात याव्यात, याबाबतचे मार्गदर्शन या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना करण्यात आले आहे. याशिवाय मजुरांची नोंदणी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे, असेही भेगडे यांनी सांगितले.

शिवाजीनगर कामगार आयुक्त कार्यालयाची इमारती अत्यंत जुनी झाली आहे. तेथे नवीन इमारत उभी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मंजुरी मागितली आहे. ती मिळताच नवीन इमारत बांधण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या कामगार संघटनाच्या दादागिरीला वचक बसविण्यात आला आहे. जर अशाप्रकारे संघटना एखाद्या कंपनीला वेठीस धरत असतील, तर अशा संघटनेतील कामगारांचा तातडीने बंदोबस्त करावा अशा सूचनाही पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असेही भेगडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)