मराठा आरक्षणासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू – सदाभाऊ खोत

दौंडमधील पत्रकार परिषदेत आमदार खोत यांची ग्वाही

दौंड  -मराठे युद्धात जिंकले आहेत, तहात हरण्याची शक्‍यता असल्याने मराठा समाजाच्या समन्वयकांनी रस्त्यावर उतरून आरक्षणाची लढाई लढावी. आम्ही तुमच्या त्यांच्यासोबत राहू, अशी ग्वाही रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली. यावेळी खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.

दौंड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्षुप वासुदेव काळे, गणेश आखाडे, रयत क्रांती संघटनेचे भानुदास शिंदे, सर्फराज शेख, कुंडलिक शिंगाडे आदी उपस्थित होते.

खोत म्हणाले की, महाविकास आघाडीतील सत्तेत असणारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस अनेक वर्षे सत्तेत असून त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असते तर त्यांनी ते कधीच दिले असते. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही.

पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी सध्या सरकार आणि मराठा समाजाच्या समन्वयकांशी चर्चा सुरू आहे. मात्र, पुनर्विचार याचिका दाखल करून ती टिकविण्यासाठी सरकारला प्रयत्न करायचेच नाहीत.

जेणेकरून आरक्षणाचा चेंडू हा केंद्राच्या कोर्टात ढकलला जाईल, अशा पद्धतीने सरकार प्रयत्न करून मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत. सरकारला मराठा, ओबीसी आरक्षण टिकवता आले नाही.

खोत म्हणाले की, सरकार शेतकरी आत्महत्या रोखू शकले नाहीत. सरकारने करोना काळात मोफत चाचण्यांची घोषणा केली. मात्र, चाचण्यांनाही पैसे मोजावे लागले आहेत. त्यामुळे या सरकारने राज्यातील जनता कंगाल करण्याचे काम केले असल्याचा आरोप आमदार खोत यांनी केला.

दरम्यान, राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. त्यातच खोत यांनी सरकारवर टीका केली आहे.

न्याय गुंडांकडे जाऊन मागायचा का?
खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला गुंडागर्दीचे सर्टिफिकेट असल्याचे वक्‍तव्य केले आहे. या वक्‍तव्याचा समाचार घेताना खोत म्हणाले की, सरकारमधील पक्षाला गुंडागर्दीचे सर्टिफिकेट असेल तर आता सर्वसामान्यांनी गुंडाकडे जाऊन न्याय मागायचा का, असा सवाल खोत यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.