जनतेचा पांग फेडण्यासाठी आयुष्य खर्ची घालणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

गडहिंग्लजमध्ये कोव्हीशिल्ड लसीचे वितरण उत्साहात

कोल्हापूर – कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला भरभरून दिले आहे. उर्वरित आयुष्य जनतेचा पांग फेडण्यासाठी खर्ची घालणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

गडहिग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीशील्ड या कोरोना प्रतिबंधक लसीच्या वितरण कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने निर्मिती केलेल्या या लसीचा २८  दिवसानी दुसरा डोस घ्यावा लागतो. हजारो जणांवर चाचणी करून या संस्थेने ही गुणवत्तापूर्ण  व दर्जेदार लस निर्माण केली आहे. त्यामुळे या लसीबाबत उठणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका.

प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर म्हणाल्या, कोरोना भारतासाठी इष्टापत्ती ठरली आहे कारण या महामारीमुळे आरोग्य यंत्रणा सक्षम झाली. स्वागत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप आंबोळे यांनी केले.

जीवन पूर्ववत होईल……..
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या सायरस पूनावाला आणि अदर पूनावाला यांनी मोठ्या जिद्दीने आणि हिंमतीने जगात पहिल्यांदा या लसीची निर्मिती भारतात केली आहे. या लसीमुळे मानवी जीवन पूर्ववत होऊन मानवाला सुखाने जीवन जगता येईल. हैदराबादची भारत बायोटेक आणि पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्थांचे आभार श्री. मुश्रीफ यांनी मानले.

यावेळी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती सौ. रुपाली कांबळे, प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, गटविकास अधिकारी शरद मगर, तहसीलदार दिनेश पारगे आदी प्रमुख उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.