पिंपरी – जास्तीत जास्त कामगारांना योजनांचा लाभ देऊ

पिंपरी -लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कष्टकरी कामगारांना अर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यानुसार फेरीवाला, बांधकाम कामगारांना लाभ देण्यात आला आहे. लवकरच घरेलू कामगार व रिक्षाचालक यांनाही लाभ मिळेल. तसेच तांत्रिक बाबींमुळे लाभ मिळाला नाही, अशा कामगारांना लवकरच लाभ देण्यात येईल, असे आश्‍वासन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन कामगारांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली. या वेळी पार्श्‍वगायक आनंद शिंदे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध उपस्थित होते.

संगणकीय प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी व करोना प्रादुर्भावामुळे कामगारांच्या नोंदणीसाठी अनेक बाधा येत होत्या. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करूनही अनेक कामगारांची नोंदणी होऊ शकली नाही. या कामागारांचेदेखील लाभार्थ्यांमध्ये समावेश करून, लाभार्थी यादी निश्‍चित कावी. तसेच अनेक ठिकाणी बंद असलेली मध्यान्ह भोजन योजना पूर्ववत करावी, अशा मागण्या या चर्चेदरम्यान करण्यात आल्या.

या विविध योजनांचा या घटकांना लाभ देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांना लाभ मिळवून देऊ. याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना दुपारी व रात्री अशा दोन्ही वेळेला सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कामगारमंत्री मुश्रीफ यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.