कोल्हापूर(प्रतिनिधी) : लाखी मण्यांबाबत सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वासन केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी दिल्ली येथे दिले.
केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क सक्तीचे केले आहे. याचे सराफ व्यावसायिकांनी स्वागत केले आहे मात्र लाखी मण्यांना हॉलमार्क करणे शक्य होणार नाही, अशीही मागणी आहे. अशा प्रकराचे दागिने करणाऱ्या १० ते १५ हजार स्थानिक कारागिरांवर यामुळे परिणाम होणार आहे.
त्याअनुषंगे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सराफ व्यावसायिकांची पियूष गोयल यांची भेट घडवून दिली. या संदर्भात भारतीय मानक ब्युरोचे उपमहानिदेशक डी. के. अग्रवाल यांच्याशी बैठक घेऊन यातून सकारात्मक मार्ग काढण्यासंबंधी सूचना गोयल यांनी केली.
दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी स्थानिक व्यावसायिकांवर कशा प्रकारे परिणाम होतील, यासंबंधी सविस्तर निवेदन देण्याची मागणी केली व त्यानुसार बीएसआयच्या अधिकाऱ्यांबरोबर पुन्हा बैठक घेऊया, असे सराफ व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाला सांगितले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, प्रीतम ओसवाल, निलेश राठोड, सुजित ओसवाल आदी उपस्थित होते.