‘मोदी सरकारचे कायदे आम्ही मानणार नाही’

सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात हजारो नागरिक एकवटले


विधान भवनावर मोर्चा धडकला, विविध संघटनांचा सहभाग

पुणे -“मोदी सरकारने केलेले कायदे आम्हाला भारतीय समजत नाहीत, त्यामुळे आम्ही हे कायदे मानणार नाही, त्या विरोधात आम्ही घटनात्मक चौकटीत लढा देऊ,’ असा पवित्रा घेत हजारो नागरिकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहीम (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीच्या (एनपीआर) अंमलबजावणीला विरोध दर्शविला.

कुल-जमात-ए-तंजीम आणि सीएए, एनआरसीविरोधी महारॅली नियोजन समितीतर्फे सीएए आणि एनआरसीविरोधात संविधान बचाव, देश बचाव महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गोळीबार मैदानापासून रॅलीला प्रारंभ झाला.

मुस्लिम समाजातील विविध पंथांचे उलेमा, महिला आणि विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था-संघटनांचे कार्यकर्ते हातात तिरंगा आणि फलक घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. कृष्णराव ढोले चौकातून नेहरू रस्त्यामार्गे विधान भवन येथे रॅलीचे सभेत रुपांतर झाले. मोर्चाच्या मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली. तसेच स्वारगेट, कॅम्प परिसर, भवानी पेठ आणि पुणे स्थानक परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले होते. याशिवाय मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. या वेळी विविध वक्‍त्यांनी मनोगत व्यक्त करताना सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या अंमलबजावणीस कडाडून विरोध दर्शविला.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
सरकारने संसदेत नवे विधेयक आणून, नागरिकत्व कायद्यातील कलम 14 (ए) रद्द करावे, संयुक्त राष्ट्र अधिवेशन 1955 अंतर्गत शरणार्थी, निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी वेगळा कायदा तयार करावा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीची मोहीम रद्द करावी, त्यामधील एनआरसीचे प्रश्‍न वगळून ही मोहीम राबवावी, या मागण्या पूर्ण होईपर्यंत केरळ व बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रात एनपीआरची अंमलबजावणी करू नये, या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घ्यावी, अशा मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.