पुणे :- शहरासाठी येत्या काळात मेट्रोचा विस्तार करून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येईल. यासाठी विविध प्रकारच्या ॲपचे आणि ई-प्लॅटफॉर्मचे एकत्रिकरण करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रभावी वापर निश्चित करण्यात येईल. ई-बससेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाला फेम 2 अंतर्गत प्राप्त 90 ई-बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, पीएमपीएमएल देशातील अग्रणी प्रकारची अपारंपरिक ऊर्जेवर चालणारी सेवा म्हणून नावारुपास येणार आहे. ही बससेवा पुणेकरांच्या पसंतीस पडली आहे. या बसेसनी २ कोटी किलोमीटर वाहतूकीचा टप्पा पूर्ण केला आहे. केंद्र सरकारने फेम 2 अंतर्गत ई-बसेससाठी मोठी सबसिडी दिल्याने लोकांवर अतिरिक्त बोजा पडला नाही. येत्या काळात अपारंपरिक ऊर्जेवर चालणारी आणि शून्य कार्बन उत्सर्जन करणारी ही देशातील पहिली बससेवा ठरेल.
राज्यातील पूर्ण सार्वजनिक वाहतूक सुविधा पर्यायी इंधनाच्या सहाय्याने चालविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रयत्न करण्यात येत आहेत. पीएमपीएमएलने सर्व चार्जिंग स्टेशन सौर ऊर्जेवर रुपांतरीत करावे आणि शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्याच्या दिशेने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुणे स्टेशन ई-बस डेपोचे उद्घाटन आणि ई-बसेसचे लोकार्पण करण्यात आले. आमदार सुनिल कांबळे यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत करण्यात आलेल्या पुणे स्टेशन बस डेपो येथे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षालय इमारतीचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.