केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : देवस्थान विकासास निधी देण्याची ग्वाही
अकोले – अकोले येथील अगस्ती ऋषी आश्रमाचा ‘श्रीराम कॉरिडॉर’मध्ये समावेश करण्यासाठी योग्य ती माहिती घेऊ. तसेच जेवढा निधी देता येईल, तेवढा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती अगस्ती देवस्थान ट्रस्टतर्फे देण्यात आली.
अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. के. डी. धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच ना. गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली. तसेच अकोले येथील अगस्ती ऋषी आश्रमाचा ‘श्रीराम कॉरिडॉर’मध्ये समावेश करण्याचे निवेदन त्यांना दिले. यावेळी प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त परबतराव नाईकवाडी, दीपक महाराज देशमुख, योगी केशवबाबा चौधरी, कपिल सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.
श्री अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. के. डी. धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे ना.गडकरी यांच्या निवासस्थानी ट्रस्टच्यावतीने त्यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी श्री. गडकरी यांनी वरील आश्वासन दिले.
वनवासात श्रीराम ज्या 12 ठिकाणी थांबले होते, तेथे ‘श्रीराम कॉरिडॉर’ बनविणार अशी घोषणा नाय गडकरी यांनी केली होती. त्यात पंचवटी व जटायूतीर्थ यांचा समावेश होता.
त्याचबरोबर ऋषी अगस्त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख होता. उपरोक्त घोषणेचा संदर्भ देऊन श्री अगस्त्यऋषींचे अभ्यासक तथा अगस्त्य कादंबरी, श्री अगस्त्य महात्म्य, श्री लोपामुद्रा चरित्र आदी ग्रंथांचे लेखक प्राचार्य डॉ अनिल सहस्रबुद्धे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री गडकरी, राय स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी अकोलेच्या श्री अगस्त्य ऋषी आश्रमाचा कॉरिडॉरमध्ये समावेश व्हावा, यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खा. विनय सहस्रबुद्धे आणि मूळचे संगमनेर येथील शाम जाजू यांनाही पत्राच्या प्रती सादर केल्या होत्या. याप्रसंगी याच अकोलेच्या आश्रमात श्रीराम सीताशोध घेताना थांबले होते.
याप्रसंगी श्री अगस्ती ऋषींनी प्रभू रामचंद्रांना अक्षय बाण भाता, दिव्य वज्र, दिव्य अस्त्रे दिली. त्यातच प्रसिद्ध रामबाणाचा समावेश आहे. याच आश्रमात श्रीलंकेपर्यंत जाण्याचे श्रीरामांना श्री अगस्त्य ऋषींनी मार्गदर्शन केले होते. लंकेहून परतीच्या प्रवासातील आश्रम निवासात श्रीरामांना अगस्ती ऋषींनी संपूर्ण हनुमानचरित्र सांगितले होते.
याच आश्रमात श्री अगस्ती ऋषी पत्नी लोपामुद्रांनी सीतामाईंना उपदेश केला होता. एकूण श्रीरामांचा या आश्रमात तीन वेळा मुक्काम झाला होता. प्रवरानदीच्या गॅझेटमध्ये व अन्य धार्मिक ग्रंथात आलेली माहिती व उपरोक्त संदर्भ शिष्टमंडळाने ना. गडकर यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी ना. गडकरी यांनी योग्य ती माहिती घेऊन यावर कार्यवाही करू, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.