लायनेस क्लबच्या माध्यमातून शहरातील महिलांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ : कदम

नगर – सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसमोर विविध प्रकारच्या अडचणी आहेत. त्या महिलांचे संघटन करुन त्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याची भूमिका लायनेस क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा तथा माजी महापौर सुरेखा कदम यांनी व्यक्त केले.
लायनेस क्लबच्या नगर शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कदम यांचा समझोता महिला मंडळातर्फे आज सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. पदाधिकारी दिपाली आढाव, नंदा शितोळे, हिरा दहिहंडे, सुनीता होमकर, आशा नगरे, गीतांजली नारा, मीना खामकर, मंदा खामकर, रेणुका नगरकर, नूतन कटारिया, वर्षा पटवेकर आदी यावेळी उपस्थित होत्या.
लायनेस क्लब ही जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी संस्था आहे. अशा महत्वाच्या संस्थेवर काम करण्याची संधी मिळाली, हा मोठा बहुमान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. दिपाली आढाव यांनी माजी महापौर कदम यांच्या कार्यकाळातील कामाचा आढावा घेतला. विविध योजना राबवून कदम यांनी शहराच्या वैभवात भर घातली असल्याची भावना आढाव यांनी व्यक्त केली. संगीता थोरात यांनी सूत्रसंचालन केले. मीनल थोरात यांनी आभार मानले.





