सोलापूर – आम्हाला विधानसभेला सन्मानपूर्वक जागा मिळतील. जागा वाढवण्यासाठी आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करणार आहेत. त्यांना पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ असो किंवा मुंबई आणि मराठवाडा असो त्यांना सन्मानपूर्वक जागा मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 175 जागा निश्चितपणाने निवडून येतील. लोकसभेची परिस्थिती वेगळी झाली. आताची परिस्थिती वेगळी आहे. बदलेल्या वातावरणात निश्चितपणाने महायुतीला यश येईल, असा विश्वास शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आगामी विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मेळाव्यातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राज्यभरातील मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाष्य केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. शहाजीबापू पाटील म्हणाले, मार्कड यांची कागदपत्र बनावट असतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. कोणत्याही लोकप्रतिनीधीची हिच मागणी राहिल.
दुसरीकडे संजय राऊत काहीही बोलतात. संजय राऊतांनी फेक न्यूज टाकायला चालू केली. महाराष्ट्रातील वातावरण गढूळ बनवायचं आणि स्वत:ची राजकीय पोळी भाजून घ्यायची, हाच यांचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनता या डावाला बळी पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला.