विधानपरिषदेसाठी बिनविरोधाचा प्रस्ताव आल्यास विचार करू – चंद्रकांत पाटील

भाजप स्वत:हून प्रस्ताव देणार नाही :चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

कोल्हापूर – राज्यातील सहा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम टप्प्यात असताना राजकीय वर्तुळात मात्र या जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘विधान परिषदेच्या सहा जागेवरील निवडणूक बिनविरोध करण्याबाबत अद्याप तसा कोणताही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यानंतर काय प्रस्ताव आहे, त्याबाबत विचार करू.’असे सूचक विधान केले.

राज्यात सध्या विधान परिषदेच्या सहा जागेसाठी रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढती आहेत. काही ठिकाणी मतदारांना सहलीवर पाठविण्यात येत आहे. दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.विधान परिषदेसाठी एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना दुसरीकडे बिनविरोधाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘भाजपची भूमिका ही समोरुन काय प्रस्ताव येईल त्यावर ठरेल. भाजप असा कोणताही प्रस्ताव देणार नाही. राज्यातील सहाही जागा आम्ही ताकतीने लढविणार आहोत. ४१५ पैकी १६५ मते आमच्याकडे आहेत. विजयासाठी ४३ मतांची आवश्यकता आहे. कोल्हापूरची लढत तुल्यबळ होईल. महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी ९० मते लागतात. भाजप आघाडीला जिंकण्यासाठी ४३ मतांची गरज आहे. तेवढी मते मिळवण्याची जुळणी आम्ही केली आहे. नागपुरातही भाजप आघाडीकडे ९० मते जादा आहेत. सहापैकी पाच जागा जिंकण्याची तयारी आहे. ’

‘उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी, २४ नोव्हेंबर रोजी आहे. २६ नोव्हेंबरला माघारीची मुदत आहे. माझं म्हणणे आहे की, जे काय करायचं असेल तर लवकर करा.’असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. बिनविरोध निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांची भूमिका महत्वाची ठरणारी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.