दहा महिन्यांत पूर्ण करू उत्पन्नाचे टार्गेट

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची ग्वाही

पुणे -आर्थिक शिस्त असलेल्या पुणे महापालिकेला लॉकडाऊनमुळे तीनशे कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. मागील वर्षी 699 कोटी रुपये दोन महिन्यांत उत्पन्न मिळाले होते. यावर्षी मात्र दोन महिन्यांत केवळ 350 ते 400 कोटी रुपयांवरच प्रशासनाला समाधानी रहावे लागले.

महापालिकेला मिळकत करामधून 350 कोटी रुपयांचे ऑनलाइन उत्पन्न मिळाले. त्याखेरीज राज्य शासनाकडून एलबीटीचा एक हप्ता प्रशासनाला मिळालेला आहे. मागील वर्षी केवळ मिळकत करामधूनच 700 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.लॉकडऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. बांधकाम बंद असल्यामुळे नवीन बांधकामाचे प्रस्ताव आले नाहीत. परप्रांतीय मजूर आपआपल्या राज्यात गेल्यामुळे बांधकाम उद्योग संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये बांधकाम शुल्कामध्ये उत्पन्न मिळाले नाही. शहरात विविध भागांत असलेल्या होर्डिंगमधूनदेखील उत्पन्न मिळत असते. तेही बंद झाले आहे.

“आयुक्‍तांनी घाई करू नये’
दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे उत्पन्नावर कोणताही परिणाम होणार नाही. येत्या काळात महापालिकेला दोन महिन्यात जो फटका बसला आहे तो भरून निघेल. आपल्याकडे अजून दहा महिने आहेत. महापालिकेचे अंदाजपत्रक हे सात हजार कोटी रुपयांचे आहे. महापालिकेला निश्‍चितच 7 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळेल. यासाठी विविध योजना येत्या काळात आम्ही आणणार आहोत. येत्या जून आणि जुलैमध्ये याची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसेल. पुणे महापालिकेला पुरवणी अंदाजपत्रकाची गरज नाही. महापालिका आयुक्‍तांनी याची घाई करू नये, असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.