नवी मुंबई : भारत आणि चीन यांच्यात झालेल्या हिंसक वातावरणानंतर भारताने मोठा निर्णय घेत राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे. भारताच्या या निर्णयाची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. कारण या बंदीला अमेरिकेनेही समर्थन दिले आहे. या बंदीमुळे भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेला चालना मिळणार असल्याचे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केले. चीनमधील कम्युनिस्ट पक्षासाठी सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या या अॅपवर भारताने घातलेल्या बंदीचे आम्ही स्वागत करतो. भारताच्या दृष्टीकोनातून या निर्णामुळे सार्वभौमत्वाचे रक्षण होईल, असे त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हटले.
दुसरीकडे, भारताच्या या निर्णयानंतर अमेरिकेच्या काही खासदारांनी शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अॅप्सला देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे म्हणत भारतासारखेच पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन सिनेटचे सदस्य जॉन कॉर्निन यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्ताला टॅग केले आहे. हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने टिकटॉक आणि इतर डझनभर इतर अॅप्सवर बंदी घातली आहे, असेही त्यांनी यासोबत म्हटले आहे.
रिपब्लिकन रिक क्रॉफर्ड यांनी ट्विट करत टिकटॉकला अवश्य जायलाच पाहिजे असेही म्हटले आहे. चीन सरकार स्वत:च्या उद्दिष्टांसाठी टिकटॉकचा वापर करत आहे. अमेरिकन कॉंग्रेसमध्ये अशी किमान दोन विधेयकं सध्या प्रलंबित आहेत, त्यामध्ये सरकारच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या फोनवर टिकटॉक वापरण्यास बंदी घालण्याचे म्हटले आहे, असे गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी असे म्हटले होते.