शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा-कॉंग्रेस

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिक बसणार असल्याचे आता निश्‍चित झाले आहे. कारण राष्ट्रवादीपाठोपाठ कॉंग्रेसनेही मुखमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीबरोबरच कॉंग्रेसनेही उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

भाजपा-शिवसेना महायुतीला सरकार स्थापनेचा स्पष्ट कौल असताना शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाकडे आग्रह धरला होता. पण, भाजपानं यावर तडजोड न करण्याची भूमिका घेतल्यानं शिवसेनेने वेगळी वाट धरली. शिवसेना बाजूला गेल्यानं जागा असूनही भाजपाला सरकार स्थापन करता आले नाही. त्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससमोर पाठिंब्यासाठी हात पुढे केला होता. आता तिन्ही पक्षाचं एकमत झालं असून मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पक्षाची स्पष्ट केली होती.

शिवसेना मुख्यमंत्रीपदामुळेच युतीतून बाहेर पडली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणे आमचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर सरकारला एक चेहरा मिळेल. आम्ही तशी मागणी करू शकतो. पण, मुख्यमंत्रीपदाबद्दलचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल, असं मलिक म्हणाले.

त्यानंतर कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार यात कोणतीही शंका नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार राज्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे, असं माणिकराव ठाकरे म्हणाले. तिन्ही पक्षांच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची सत्तास्थापन करण्यासंदर्भात अंतिम चर्चा होणार आहे. आज संध्याकाळीच सत्तास्थापन करण्याचा दावा केला जाणार नाही. मात्र, कधी करायचा यासंदर्भात निर्णय होऊ शकतो, असं ठाकरे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)