मोदींनी सर्वप्रथम लस घेतल्यास इतिहास घडेल; नवाब मलिकांचा खोचक सल्ला

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या करोना संसर्गावरील लसीला भारतात परवानगी मिळाली आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेक देश भारताकडे लसीची मागणी करत आहेत. भारतात देखील करोना लस वितरित करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. यानुसार सीरम इन्स्टीट्युटला केंद्र सरकारकडून पहिली पर्चेस ऑर्डर अर्थात खरेदी आदेश देण्यात आला आहे. मात्र राज्यात लसीच्या सुरक्षिततेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्‍सिन या दोन करोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने देशात येत्या 16 जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होणार असल्याचे आधीच सांगितले आहे. मात्र या लसीसंदर्भात अद्याप गोंधळ असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. करोना लस वितरित करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेऊन लस घ्यावी. जेणेकरून लसीवरील संशय कमी होईल आणि लसीची विश्‍वासार्हता वाढेल. तसेच यामुळे पंतप्रधान मोदी नवा इतिहास घडवतील, असंही मलिक यांनी म्हटले आहे.

 

करोना प्रतिबंधक लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योद्धयांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांच्या लसीकरणाची योजना आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील व्यक्ती आणि को-मोर्बिडीटी असणारे 50 पेक्षा कमी वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जातील. या पार्श्‍वभूमीवर सरकारने सीरमला पर्चस ऑर्डर दिली आहे.

दरम्यान सीरमची करोना लस 200 प्रती डोस दराने देण्यात येणार असल्याचे सीरमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जगभरात कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात हाणी झाली आहे. आता लस उपलब्ध झाल्याने सर्वांना दिलासा मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.