बंद बाजारात घुमल्या ‘वुई वॉन्ट जस्टीस’च्या घोषणा

तरुणाच्या खुनाने खदखद : व्यापाऱ्यांनी केला गुन्हेगारीचा निषेध
आरोपींना लवकर न पकडल्यास बेमुदत बंदचा इशारा

पिंपरी – एरव्ही दर मंगळवारी पिंपरी कॅम्पमधील दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद असतात. परंतु आज बुधवार असतानाही पिंपरी कॅम्पमधील सर्व दुकाने बंद होती. सोमवारी पिंपरीत हितेश मुलचंदानी या तरुणाचा निघृण खून करण्यात आला होता. यामुळे व्यापरी वर्गात प्रचंड खदखद असून आपला रोष व्यक्‍त करण्यासाठी पिंपरीतील व्यापारी रस्त्यावर उतरले आणि बंद बाजारात “वुई वॉन्ट जस्टीस’च्या घोषणा घुमू लागल्या होत्या.

हॉटेलमध्ये झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या हितेश मुलचंदानी या युवकाचा पहाटे खून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पिंपरीमधील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन निषेध व्यक्‍त केला. आरोपीना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे. आज सकाळी येथील व्यापाऱ्यांनी हातात “वुई वॉन्ट जस्टीस’, “गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे’ असे फलक घेऊन निदर्शने केली. आज व्यापाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले असून, आरोपीला तात्काळ न पकडल्यास बेमुदत बंद करण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांना बुधवारी दिला आहे.

शहरातील व्यापारी असोसिएशनने बुधवारी दुपारपर्यंत बाजारपेठेत कडकडीत बंद ठेवला. तात्काळ आरोपींचा छडा लावून व्यापाऱ्यांना सुरक्षा द्यावी, गस्तीमध्ये वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बंदला आमदार गौतम चाबुकस्वार, माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी पाठिंबा दिला. तर बंदमध्ये शिवनदास पमनानी, मनोहर जेठवानी, अजित कंजवानी, जयेश चौधरी, मंजू मुलचंदानी, दिलीप मदनानी, राजेश चांदवानी, शाम मंगनानी, महेश मोटवानी, राजू मतानी, पहेलाज लोकवानी, शाम गुलतानी, अनिल सचदेव, भगवानदास खत्री, मधू सबनानी, जितू मंगतानी या व्यापाऱ्यांचा सहभाग होता.

मंगळवारी सायंकाळी मृतदेह पोलीस चौकीत
क्षुल्लक कारणावरुन तरुण मुलाचा अतिशय क्रूरपणे खून केल्याने संतप्त नातेवाईक आणि स्थानिकांनी मंगळवारी सायंकाळी हितेशचा मृतदेह पिंपरी पोलीस चौकीत नेला. तरुणाचा खून झाल्याने व्यापारी वर्गात प्रचंड रोष खदखदत असल्याने मृतदेह चौकीत आणल्यामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण भावुक आणि गंभीर झाले होते. शांततापूर्ण तणाव सगळीकडे पहायला मिळत होता. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याचे आणि दोषींना शिक्षा मिळवून देण्याचे आश्‍वासन देत नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.

ठोस कारवाई नसल्याने गुन्हेगारांचे फावते

शहरात विविध गुन्हेगारी वाढत आहे. वारंवार तक्रार करुनही ठोस कारवाई होत नसल्याचे गुन्हेगारांचे फावले आहे. पिंपरी कॅम्प ही शहराची प्रमुख बाजारपेठ आहे. याच परिसात अनेक कॉलेज आणि शाळा आहे. येथील याच गर्दीचा फायदा टवाळखोर, गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक घेतात. घोळका करून उभे राहणे, किरकोळ कारणावरून वाद उकरून काढणे, सुसाट गाड्या पळविणे, वाहने थेट मंदिर व शाळेच्या रस्त्यावर उभी करणे असे प्रकार केले जातात. पोलिसांचे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत असून यावर कारवाई करणे आवश्‍यक आहे.
– ऍड. नरेश शमनानी

योग्य उपाययोजना करा

गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावन निर्माण झाली असून, त्या आरोपीना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील पोलीस गस्तीत वाढ करण्यात यावी. शहरात झालेल्या घटना आणि भविष्यातील संभाव्य दृष्टीने योग्य ती पाऊले उचलण्यात यावीत.
– पेहलाज लोकवानी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)