अहमदाबाद : इस्लामिक दहशतवादापासून आपल्या नागरिकांना वाचवण्यसाठी भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एकत्र आहेत, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात ते बोलत होते. तब्बल सव्वा लाख भारतीयांनी रणरणत्या उन्हात उभे राहून ट्रम्प यांचे स्वागत केले.
दहशतवाद आणि दहशतवादाचे परिणाम यामुळे हे दोन्ही देश होरपळून निघाले आहेत. त्यामुळे इस्लामिक दहशतवाद्याच्या धोक्यापासून आपल्या नागरिकांना वाचवण्यसाठी दोन्ही देश कटीबध्द आहेत, असे ते म्हणाले. आपल्या सरकारने इसिसविरोधात कठोर पावले उचलली. ही संघटना जवळपास नेस्तनाबूत केली आहे. त्याचे उपद्रवमुल्य संपूर्ण नष्ट केले आहे. त्याचा मास्टर माइंड अल बगदादी याचा खात्मा केला आहे,असे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.
आपल्या सीमांचे संरक्षण करण्याचा प्रत्येक देशाचा हक्क आहे. दहशतवाद रोखण्यासाठी आणि त्याच्या तत्वज्ञानाविरोधात अमेरिका आणि भारत बांधील आहेत, कटीबध्द आहेत, असे ते म्हणाले. दहशतवादी आणि त्यांचे गट संपवण्यासाठी आपले सरकार पाकिस्तान सरकार बरोबर सकरात्मक काम करत आहे, असे ट्रम्प म्हणाले.
हेलिकॉप्टर आणि संरक्षण उत्पादनांच्या व्यवहाराचे तीन अब्ज अमेरिकन डॉलर्सचे करार उद्या करण्यात येईल, अशी घोषणाही ट्रम्प यांनी केली. ते म्हणाले, दोन्ही देशातील संरक्षण सहकार्य मजबूत करण्यात येईल. त्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट अशी संरक्षण उत्पादने आम्ही भारतीय लष्कराला देणार आहोत. त्यात अत्याधुनिक हेलिकॉप्टरचा समावेश आहे, असे ते म्हणाले. आमचे प्रतिनिधी उद्या तीन अब्ज डॉलर्सचे करार करतील. त्याद्वारे ही जगातील सर्वोत्कृष्ट अशा संरक्षण उत्पादने भारतीय लष्कराकडे सोपवण्यात येतील, असे ते म्हणाले.