आम्ही ‘त्यावर’ पर्याय सुचवतो, सरकारने पर्यायाचा विचार करावा

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर शिवसेनेचा सरकारला सल्ला

मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत मांडणार आहेत. ज्यावेळी हे विधेयक मांडले जाईल तेव्हा लोकसभेत गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. कारण यापूर्वी अनेक राजकीय पक्षांनी आणि राज्यांनी याला विरोध केला आहे. दरम्यान, या विधेयकावर शिवसेनेनेही आपली भुमिका मांडली आहे. आम्ही पर्याय सुचवतो, मोदी-शाह यांनी ते करुन दाखवण्याचे साहस दाखवावे, असे आवाहन शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखातून केले आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून जर वोट बॅंकेचे राजकारण केले जात असेल तर ते देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे आम्ही यावर पर्याय सुचवतो, त्यावर सरकारने विचार करावा, असे शिवसेनेने म्हटले आहे. नव्या नागरिकांसाठी पुढील पंचवीस वर्षे मतदानाचा अधिकार देऊ नये तसेच दुसऱ्या देशातील नागरिकांना स्विकारण्यापेक्षा आपल्या देशातील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात सरकारने सरकारनं कडक पावलं उचलावीत, असेही शिवसेनेने मोदी सरकारला सुचवले आहे.

आपल्या देशात अनेक समस्या असताना बाहेरची ओझी का लादून घेतली जात आहेत? असा सवालही शिवसेनेने सरकारला केला आहे. देशाची आर्थिक स्थिती नाजूक असताना सरकार इतर देशांतील नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेत आहे. या निमित्ताने सरकारने देशात पुन्हा हिंदू आणि मुस्लिम अशी फाळणी केली आहे. बांगलादेशींच काय प्रत्येक घुसखोला देशातून हाकलण्याची भुमिका शिवसेनेने अमित शाहांच्या आधीच मांडली आहे. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा विधेयकावर आम्ही काय करावे, याचा सल्ला आम्हाला कोणी देऊ नये, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपाला सुनावले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.