बारामती -आरोग्यमय जीवनासाठी आपल्या आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये “सूर्यनमस्कारास सर्वांगसुंदर व्यायाम’ असे संबोधण्यात आले आहे. समाजात सूर्यनमस्काराबद्दल जागृती होण्यासाठी तथा शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी बारामती स्पोर्टस फाऊंडेशनचे सदस्य अजिंक्य साळी यांनी सूर्योदय ते सूर्यास्त असे सलग 12 तास मंत्रोच्चारसह सूर्यनमस्कार घालण्याचा अनोखा विक्रम केला.
अजिंक्य साळी हे जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत . त्यांना व्यायामाची आवड असून आरोग्यमय विद्यार्थी घडावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. या उपक्रमात बारामती स्पोर्टस फाऊंडेशनच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून अद्वैत भोसले, अनुष्का राऊत, वैष्णवी ननवरे,
सचिन बर्गे यांनी अजिंक्य यांच्या बरोबर 1708 सूर्यनमस्कार घातले आणि अजिंक्य यांचा उत्साह वाढविला. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून, अजिंक्य यांचा अनोखा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करणार असल्याची महिती अजिंक्यचे मार्गदर्शक तसेच बारामती स्पोर्टस फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी दिली.