माओवादी विचारधारेशी विचारानेच लढावे लागेल

स्मिता गायकवाड यांचे शिशिर व्याख्यानमालेत प्रतिपादन

पिंपरी – “शहरी माओवाद हा जंगलातील माओवादापेक्षा देशासाठी अधिक घातक आहे. माओवाद संपविणे हे आपल्या देशासाठी एक मोठे आव्हान आहे. हे विचारधारेचे युद्ध आहे. विचारानेच ही लढाई लढावी लागेल. माओवाद्यांच्या सशस्त्र कारवायांना पोलीस आणि सीआरपीएफचे जवान सशस्त्र कारवायांनी उत्तर देतील. माओवादी विचारधारा ही लोकशाही व संविधान विरोधात कशी चुकीची आहे. हे जोपर्यंत सर्वांना कळत नाही तोपर्यंत ही लढाई जिंकू शकणार नाही’, असे मत कॅप्टन (निवृत्त) स्मिता गायकवाड यांनी मांडले .

रोटरी क्‍लब ऑफ चिंचवडच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित शिशिर व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी “शहरी नक्षलवाद’ या विषयावर त्या बोलत होत्या. व्याख्यानमालेच्या उद्‌घाटन प्रसंगी रोटरीचे प्रांतपाल रवी धोत्रे, चेतना नागरीक मंचाचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल(निवृत्त) बाबूराम चौधरी, रोटरी क्‍लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, सचिव प्रवीण गुणवरे, प्रकल्प प्रमुख संजय खानोलकर आदी उपस्थित होते.

कॅ. गायकवाड म्हणाल्या, “खऱ्या आंबेडकरवादी संघटना बाबासाहेबांचे संविधानवादी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी कार्य करतात. तर माओवादी संघटना संविधान व लोकशाही उलथून टाकण्याचे काम करीत आहेत. शहरी माओवाद्यांना बंदुकीच्या जोरावर राजकीय सत्ता हवी असते. नागरिकांच्या मनावर व बुद्धीवर नियंत्रण मिळवून सत्ता काबीज करणे हा त्यांचा हेतू असतो. माओवाद्यांचे समर्थन करणारे लेखन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. मात्र माओवाद्यांच्या विरोधात त्यांचे खरे रूप दाखवणारे लिखाण झाले पाहिजे. माओवाद्यांनी विकासासाठी स्वतः काहीच केले नाही. सरकार करीत असलेल्या विकासात मात्र अडथळा निर्माण केला.’ शुभदा गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. महावीर सत्यान्ना यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.