पुणे: करोना प्रतिबंधक लसीचा पाचव्या टप्प्याला दि. 1 मेपासून सुरूवात होणार आहे. त्यामध्ये शहरातील सुमारे 68 टक्के लोकसंख्या समाविष्ट असेल. पण, यासाठी केंद्र वाढवणे किंवा नियोजन करण्याबाबत केंद्र सरकारने कोणत्याही सूचना महापालिकेला दिल्या नाहीत. त्यामुळे या मोहितेबाबत गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
एक मेपासून मोठ्या संख्येच्या लसीकरणाची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. पण, हे सर्व नियोजन केंद्र सरकारच्या निर्देशानुसार केले जाणार असून, महापालिकेला त्याची प्रतीक्षा आहे. तसेच जर महापालिकेने त्यांच्या लसीकरणासाठी नवीन योजना राबवल्या आणि त्याला जर केंद्राकडून परवानगी मिळाली नाही; तर त्या रद्द कराव्या लागतील, यामुळे महापालिकेला आता कोणतेच नियोजन करता येत नाही.
महापालिकेकडे सध्या 172 लसीकरण केंद्रांवर लस दिली जाते. याव्यतिरिक्त आणखी 215 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू करण्याची परवानगी केंद्रीय आरोग्य खात्याकडे आरोग्य विभागाने मागितली आहे. मात्र, त्यालाही अजून परवानगी दिलेली नाही. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया रेंगाळली आहे.