जयकुमार गोरेंना घरी बसवण्याचा “आमचं ठरलंय’ नेत्यांचा निर्धार

बिदाल   – माण आणि खटाव तालुक्‍यातील “आमचं ठरलंय’ असे सांगणाऱ्या नेत्यांचा निर्धार मेळावा दहिवडी बाजार मैदानावर झाला. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीसाठी घेण्यात आलेल्या या मेळाव्याच्या माध्यमातून माजी आमदार जयकुमार गोरे विरोधक सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. गोरेंना यंदा “घरी’ बसवायचेच, असा निर्धार या नेत्यांनी केला आहे.

मेळाव्यास माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, रणजितसिंह देशमुख, भाजप नेते अनिल देसाई, प्रभाकर देशमुख, संदीप पोळ, संदीप मांडवे, सुवर्णा देसाई, तानाजी काटकर, संदीप भोसले, किशोर सोनवणे, सभापती रमेश पाटोळे उपस्थित होते.
अनिल देसाई म्हणाले, जयकुमार गोरे हे जनतेला फसवत आहेत. आम्ही 2003 पासून दिलेलया लढ्यामुळे नरवणे परिसरात पाणी आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हे गोरे घरी बसतील.
यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले, माणचे माजी आमदार दहावी नापास आहेत. त्यांनी कै. सदाशिव पोळ यांच्यावर केलेले आरोप, ही माणदेशाची संस्कृती नाही. मतदारसंघातील दहशतवाद मिटवायचा आहे. घार्गे म्हणाले, आम्ही भविष्यकाळात मतदारसंघाचा विकास करणार आहोत.
डॉ. येळगावकर म्हणाले, त्यांनी प्रत्येक निवडणुकीत जनतेची दिशाभूल केली. आंधळी धरणात पाणी यायला एक वर्ष लागणार आहे. अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले. राहुल पाठक यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.