भयमुक्त भोसरीसाठी आम्ही पोलीस आयुक्तालय केले!

पिंपरी  – भोसरी भयमुक्त करण्याची भाषा करणारे स्वत: काठ्या घेऊन बाहेर पडणार होते की काय? असा सवाल करत आमच्याच सरकारने पोलीस आयुक्तालय केले, असा पलटवार भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी जाहीर सभेत केला.

आमदार लांडगे यांच्या प्रचारासाठी भोसरी गावजत्रा मैदान येथे आयोजित सभेत लांडगे बोलत होते. यावेळी भाजपचे खासदार गिरीष बापट, अमर साबळे, शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला मोळक, भाजयुमोचे शहराध्यक्ष रवी लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद, महिला संघटिका सुलभा उबाळे, माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे, भाऊसाहेब अडागळे आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, शितलबाग पुलाच्या वाढलेल्या खर्चाबद्दल आपल्यावर टीका केली जाते. मात्र, त्यावेळी तुमच्या घरातलाच महापौर होता. विरोध का केला नाही? असा सवाल त्यांनी केला. मी मोठा होत होतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात सलत होतो. आता मी मोठा झालो तर ते माझे पाय ओढत आहेत. शास्तीकर रद्द करा असे ते आज म्हणतात.

पण विधी मंडळ सभागृहात हा विषय पारित झाला तेव्हा त्यांनी विरोध का केला नाही? असा सवाल आमदार लांडगे यांनी केला. आम्ही शास्तीकर एक हजार स्क्वेअर फुटापर्यंत माफ करण्याची मानसिकता दाखवली, तुम्ही तेही केले नाही, बफर झोन, साडेबारा टक्के जमीन परताव्याचा प्रश्‍न आम्ही सोडवला. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भामा आसखेड योजना आम्ही आणली. मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचे डोंगर झाले होते. कचरा टेंडरमध्ये घोटाळा होत होता. म्हणून आम्ही “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आणला तर यांना तिथेही भ्रष्टाचार दिसू लागला, अशी टीका आमदार लांडगे यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)