मुंबई – राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच राजकीय खडाजंगी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या महाप्रबोधन यात्रेद्वारे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. महाप्रबोधन यात्रेतील एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये अंधारे या व्यासपीठावर असताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने थेट विरोधकांचे हात पाय तोडण्याची भाषा केल्याचे पाहायला मिळत आहे.
सुषमा अंधारे यांनी मंगळवारी सोलापुरात महाप्रबोधन यात्रेदरम्यान सभा घेतली होती. यावेळी व्यासपीठावरून बोलताना ठाकरे गटाचे सोलापूर शहराचे संपर्कप्रमुख अनिल कोळीक यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. कोळीक यांनी भाषणात काही शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा उल्लेख केला जे माहिती पोहचवण्यासाठी आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशा कार्यकर्त्यांना इशारा देत ते म्हणाले,”जर त्यांनी काही उद्योग केला तर शिवसैनिकांना आपला थेट आदेश आहे त्याचे हात पाय काढल्याशिवाय त्याला बाहेत सोडायच नाही”.
काही कार्यकर्ते शिंदे गटाला माहिती पुरण्यासाठी आणि रेकॉर्डिंग करण्यासाठी आले असल्याचे देखील कोळीक यावेळी म्हणाले. यावेळी मंचावर सोलापूरमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या. गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधत आहेत. आगामी निवडणूक आणि पक्षबांधणीच्या दृष्टीने महाप्रबोधन यात्रा ठाकरे गटासाठी महत्वाची आहे.