मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांनी हा खटला चालवायचा नसल्याची भूमिका घेतली आहे. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. परंतु, आम्हाला खटला चालवायचा नाही, अशी भूमिका अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात मांडली आहे. आता शुक्रवारी ( 6 फेब्रुवारी ) पुन्हा याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत एन्काऊंटर झाला होता. त्याप्रकरणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांनी बनावट चकमकीत मुलाची हत्या केल्याचा आरोप याचिकेद्वारे केला होता. यानंतर अक्षय शिंदेची बनावट चकमकीत हत्या झाल्याचे दंडाधिकारी चौकशीत निष्पन्न झाले होते. याप्रकरणी अक्षय शिंदेच्या मृत्यूस पोलीस वाहनाच्या चालकासह पाच पोलीस जबाबदार असल्याचे सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने 20 जानेवारीला सरकारला दिले होते.
न्यायालयात अक्षय शिंदेचे आई-वडील म्हणाले, आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. आमच्या सुनेला नुकतेच मूल जन्माला आलेले आहे. आम्हाला आता त्याच्याकडे जायचे आहे. त्यामुळे ही दररोजची धावपळ आणि प्रवास आम्हाला जमत नाही. आमच्या राहण्याची सोय कुठेही नाही. अशात आम्हाला हा न्यायालयीन लढा लढायचा नाही. याप्रकरणी पुन्हा उच्च न्यायालयात शुक्रवारी ( 7 फेब्रुवारी ) सुनावणी होणार आहे. शुक्रवारी उच्च न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.