“राजकारणासाठी आम्ही अयोध्येला जात नाही आणि गेलो नाही…”

खासदार संजय राऊत यांची भाजपवर टीका

मुंबई : देशातील अनेक वर्ष वादाचा विषय ठरलेल्या अयोध्येच्या राम मंदिराच्या निर्माणाची अखेर तारीख ठरली आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार कि नाही असा सवाल निर्माण झाला होता त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. अयोध्या आणि शिवसेनेचं जुनं नातं असून ते राजकीय नाही. राजकारणासाठी आम्ही अयोध्येला जात नाही आणि गेलो नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे असंही ते म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असून यासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिले आहे का ? या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिले. “उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही गेले होते आणि झाल्यावरही गेले. उद्धव ठाकरे अयोध्येला नेहमी जातात. अयोध्येचा रस्ताच शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्येच्या रस्त्यावरील अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत, ते राजकारण म्हणून नाही. अयोध्या आणि शिवसेनेचं नातं कायम आहे. राजकारण म्हणून नाही तर श्रद्धा आणि हिंदुत्त्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान केलं आणि ते कायम राहील,” असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

भूमिपूजन निमंत्रणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “राम जन्मभूमी न्यास यांच्या ताब्यात असून त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रण दिले आहे. आता किती लोक बोलवणार आहेत, सोशल डिस्टन्सिंग, राजकीय सोशल डिस्टन्सिंग किती पाळणार आहेत यावर ते अवलंबून आहे”. शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “करोनाची लढाई पांढऱ्या कपड्यातील देवदूत लढत आहेत. उद्धव ठाकरेंनी याआधी सांगितलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील कबुली दिली आहे देशातील लाखो डॉक्टर, पोलीस, नर्स, वॉर्डबॉय अशा सगळ्यांचे करोनाशी लढताना बलिदन झालं आहे. ही लढाई देवाच्या आशिर्वादाने तेच लढतील”.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.