मुंबई – महाराष्ट्रातील सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्याच्या मार्गावर असल्याची टीका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र, कोणीही ‘माय का लाल’ आला तरी योजना बंद पडणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पहिल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकारमधील कार्यकाळ पहा आणि मागच्या दोन सव्वा दोन वर्षात आम्ही केलेला कामाचा कार्यकाळ पहा. फरक तुम्हाला स्पष्ट दिसेल, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या सर्व योजनांमध्ये आडवे येण्याचे काम विरोधक करत आहेत. मात्र त्यांना आडवे करण्याचे कामच जनता करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आमच्या कार्यकाळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हरियाणा मध्ये आमचा विजय होणार असे ढोल वाजत होते. मात्र हरियाणाच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. आता महाराष्ट्रात देखील तसेच होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले आहे.
मी गरीब कुटुंबातून आलो आहे. मी गरीबी पाहिलेली आहे. माझी आई कशी तगमग करायची. कशा पद्धतीने कुटुंब चालवायची, हे मी पाहिले आहे. त्यामुळे माझ्याकडे अधिकार येताच, सर्वात आधी आमच्या लाडक्या बहिणीसाठी हा निर्णय घेतला. लाडक्या बहिणींना पैसे दिले जात आहेत. हा निर्णय आम्ही का घेऊ नये? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे.
हे गोरगरिबांचे सरकार आहे. अधिकाऱ्यांनी देखील सर्वसामान्यांचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा एकही अधिकारी जागेवर ठेवणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. हे जनतेचे राज्य आहे. सर्वसामान्य व्यक्तीचे राज्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.