“प. बंगाल निवडणुकीत व्यस्त असल्याने मोदींशी बोलणं होऊ शकलं नाही, पण… “

मुंबई – करोना संसर्ग झपाट्याने वाढत असून आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला सूचना देताना उद्योजकांना मदतीसाठी आवाहन केलं आहे. तसेच केंद्राकडून मिळत असलेल्या मदतीसंदर्भात सांगितलं.

ऑक्सिजनची राज्याला खूप गरज असून सध्या सर्व उत्पादित ऑक्सिजन वैद्यकीय कारणास्तव वापरला जात आहे. रुग्ण संख्या पाहता आणखी ऑक्सिजनची गरज भासत असून आपण पंतप्रधानांना देखील तसे कळविले आहे. कालही त्यांना संध्याकाळी संपर्क केला होता. मात्र ते पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यस्त असल्याने बोलणे होऊ शकले नाही. मात्र केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य मिळत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान कोविडच्या किती लाटा येतील ते आज सांगू शकत नाही. मात्र आता राज्यातील उद्योगांनी सुद्धा येणाऱ्या लाटेला तोंड देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन आत्तापासूनच करावे उदाहरणादाखल कोविड सुसंगत कार्यप्रणाली स्वीकारणे, चाचणी व लसीकरणाच्या सुविधा उभारणे, कामगार व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष यंत्रणा निर्माण करणे, आपल्या परिसरात विलगीकरण व्यवस्था उभारणे तसेच बेड्स उपलब्ध ठेवणे, वर्क फ्रॉम होमची यंत्रणा विकसित करणे, कामगारांच्या कामाच्या वेळांत तसे अनुरूप बदल करणे अशा सूचना त्यांनी दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.