26/11 च्या स्मृतीदिनी रतन टाटांचे मनोगत
नवी दिल्ली : आम्ही जखमी होऊ शकतो पण नष्ट होऊ शकत नाही अशा शब्दात उद्योगतपी रतन टाटा यांनी आज 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या संबंधात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबईत टाटा समुहाच्या मालकीच्या ताज महाल हॉटेलवरही हल्ला झाला होता. तेथील हे हल्ला नाट्य तीन दिवस सुरू होते. त्या वेळी खुद्द रतन टाटा यांनी तेथे उपस्थित लाऊन या साऱ्या प्रकाराचे ते साक्षीदार बनले होते.
आज या घटनेच्या स्मृतीदिनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की, या हल्ल्याच्या घटनेबद्दल बरेच काही बोलले गेले आहे. या ह्ल्याच्या स्मृती दु:खद आहेत. यात जी प्राणहानी झाली ती मनाला वेदना देणारी आहे. या हल्ल्यात संपुर्ण मुंबई शहरात जे लोक प्राणाला मुकले त्यांना आम्हीं विसरू शकत नाही. पण या धक्क्यातूनही मुंबई लवकर सावरली.
शहराच्या या धैर्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. तुम्ही आम्हाला जखमी करू शकता पण तुम्ही आम्हाला नष्ट करू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. रतन टाटा यांनी या हल्ल्यातील शहीद लोकांच्या परिवारालाही आपल्या ग्रुपतर्फे मोठीच मदत केली आहे. या हल्ल्यात 166 जण ठार झाले तर 300 जण जखमी झाले आहेत.